Wednesday, August 22, 2007

तु विसरु शकणार नाहीस...........

तु विसरु शकणार नाहीस
नदीचा काठ, चमचमतं पात्र
उतरता घाट, मोहरती गात्रं

तु विसरु शकणार नाहीस
कलंडता सुर्य, लवंडती सांज
पक्षांच्या माळा, किणकिणती सांज

तु विसरु शकणार नाहीस
सोनेरी उन, वा-याची धुन
पावलांची चाहूल, ओळखीची खुण

तु विसरु शकणार नाहीस
दिलेला शब्द, ओझरता स्पर्श
दडलेले प्रेम, ओसंडता हर्ष

तु विसरु शकणार नाहीस
हातात हात, अन् तुझं माझं हितगुज
आंब्याच्या झाडावर, चिमण्यांची कुजबुज

तु विसरु शकणार नाहीस
भिजलेले डोळे, विरलेली स्वप्नं
भिजलेली वाट, उरलेले प्रश्न
तु विसरु शकणार नाहीस

आणि मी ही विसरु शकणार नाही

संध्याकाळचा पाऊस मला...........

संध्याकाळचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा
माझे गाणे ऐकून त्यातले चार शब्द मागायचा

मी शब्द दिल्यावरती पाऊस अगदी खुश होई
नखशिखान्त भिजवून मला ओलाचिंब करुन जाई

संध्याकाळचा पाऊस मग रिमझिम रिमझिम बरसायचा
माझं घर भिजवून पुन्हा अंगणभर पसरायचा

इंद्रधनु होऊन पाऊस सात रंगात फुलत असे
ऊन्हात पाऊस पावसात ऊन छप्पापाणि खेळत असे

पावसात चिंब चिंब भिजुन मनामध्ये मोहोर फुटत असे
पावसामुळे पावसासकट संध्याकाळ हवी वाटे

संध्याकाळचा पाऊस मला थेंब न थेंब आठवतो
संध्याकाळचा पाऊस मला थेंब न थेंब आठवतो
अजूनसुध्दा माझ्यासाठी पाऊस गाणी पाठवतो

आठवतंय ..........

आठवतंय
आपण खुप भांडायचो
झालं गेलं विसरुन पुन्हा नवा डाव मांडायचो

आठवतंय
तु फुलं माळायचीस
मी गंध घेतल्यावर फुलासारखी फुलायचीस

आठवतंय
तुला गाणं आवडायचं
तुला गाणं आवडतंय म्हणुन मला गाणं सुचायंच

आठवतंय
तु एकदा रुसली होतीस
तुझा राग ओसरल्यावर कुशीत येऊन बसली होतीस

आठवतंय
तुला गजरा दिला होता
तु मात्र मीच तुला माळावा असा हट्ट धरला होतास

आठवतंय
एकदा मला लागलं होतं
तुझ्या डोळ्यात आख्खं आभाळ रात्रभर जागलं होतं

आठवतंय
दिलं होतंस एक वचन
विसरणार नाहीस कधी जपशील माझी आठवण
आठवतंय ना..............

अशीच यावी वेळ एकदा................

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचीत काही तुझ्या समीप मी असताना

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चिट्टपाखरु केवळ तुझी नि माझी जवळीक

संकोचाचे रेशीम पदडे हा हा म्हणता विरुन जावेत
समय सरावा मंद गतीने अन् प्रितीचे सुर जुळावे

मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तु हवे हवेसे असताना

शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले
शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले
मुक्तपणे तु उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले

आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही..

आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही

सारे प्रहर
आपले शहर
गर्दीचा कहर

त्या गर्दीत तु मला आणि मी तुला शोधायचो
शोधता शोधता आपणच मग हरवायचो

एकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरायचो
जसे एकाच ट्रेनमध्ये वेगळ्या डब्यात शिरायचो

अधुन मधून दुर जायची आपली सवय तिथली
तुझं गाव कुठलं आणि पायवाट कुठली

एकमेकांची ऊगीच अशी चेष्टा करायचो
गोधंळलेले आपले चेहरे हसत हसत पहायचो

तीच चेष्टा खरी होईल कधीच वाटलं नव्हतं
गर्दीत तेव्हा डोळ्यात पाणि दाटलं नव्हतं

आता वय निघून चाललयं हलक्या हलक्या पावलांनी
त्यात मला वेढलंय पुन्हा तुझ्या जुन्या सावल्यांनी

आता एक एक सावलीत ऊन्हासारखे सारं लख्ख आठवतयं
एकट्यामधुन ऊठुन मला गर्दीत कोणी पाठवतेय

मी ऊठुन येईनही
मागे वळुन पाहीनही
मलाच शोधत राहीनही
गर्दीत हरवून जाईनही

तुला मात्र कुणी तुझे पाठवेल की नाही कुणास ठाऊक
तुला मात्र कुणी तुझे पाठवेल की नाही कुणास ठाऊक

आलीस तरी तुला सगळं काही आठवेल की नाही कुणास ठाऊक
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही

सळसळणारा वारा आणि सोन पिवळ्या रानात.......

सळसळणारा वारा आणि सोन पिवळ्या रानात
तुझं माझं भांडण होतं संध्याकाळच्या उन्हात

मी म्हणतो हे तुझं नेहमीचंच वागणं
रानामध्ये वेड्यासारखं वाट पहायला लावणं

तु म्हणतेस आपलं काही जमलं आहे मेटकुट
याची सा-या गावामध्ये सुरु आहे कुजबुज

कशीबशी आले अजुन उर फुलतो आहे
तुला काहीच कळू नये तुझी कमाल आहे

राग होतो अनावर तु बसतेस तोंड फिरवुन
वेळ मात्र कापरासारखी जात असते उडून

माझ्या मनात तु बोलशील तुझ्या मनात मी
बोलावसे वाटतय पण आधी बोलायचे कुणी

अखेरीला मध्ये पडतो सळसळणारा वारा
तुझ्या पदरामध्ये टाकतो गुरफटवून मला

मी हळुच उठून मागतो माफी तुझ्या कानात

मी हळुच उठून मागतो माफी तुझ्या कानात
तुझं माझं भांडण मिटतं संध्याकाळच्या उन्हात
सळसळणारा वारा आणि सोन पिवळ्या राना

संध्याकाळ जवळ आली की............

संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं

माणसांमध्ये असुनसुध्दा मी अगदी एकटा असतो
अळवावरचा थेंब जसा त्यावर बसुन वेगळा असतो

मला व्याकूळलेला पाहून सुर्य क्षणभर रेगांळतो
इंद्रधनु होतो आणि सात रंगात ओघळतो

आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुदं हवा
वा-यावरती लहरत येतो तुझ्या आठवणींचा थवा

एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फुलुन
तु आता येते आहेस याची मला पटते खुण

पैजंणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास
चोहिकडे भरुन राहतात घमघमणारे तुझे भास

खरंच,
संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं